बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यातील केळवाडी गावात असलेल्या स्टेट बॅंकेच्या शाखेवर आज दरोडा टाकून चोरट्यांनी तेथील 20 लाखांची रोकड पळवून नेल्याची घटना घडली आहे. या बॅंकेत जबरी चोरी झाल्याचा प्रकार आज सकाळी साडे नऊच्या सुमाराल उघडकीला आला.
खिडकीचे गज कापून चोरटे बॅंकेत शिरले. त्यांनी गॅस कटरचा वापर करून तिजोरी फोडली आणि त्यातील 20 लाखांची रोकड घेऊन ते फरारी झाले. चोरट्यांनी पळवून नेलेली एकूण रक्कम 20 लाख 81 हजार 575 इतकी आहे असे बॅंकेच्या सूत्रांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच श्वान पथकासह वरीष्ट पोलिस अधिकारी तेथे दाखल झाले. त्यांनी शोध कार्य हाती घेतले आहे. घटनास्थळाजवळच चोरट्यांनी वापरलेली बॅटरी, हात रूमाल, वगैरे साहित्य तेथे सापडले आहे.