कोलकाता – संजीव गोयंकांच्या आरपीएसजी समुहाने लखनौ संघ विकत घेतला होता. या समुहाकडे कोलकातातील प्रसिद्ध मोहन बगान फुटबॉल क्लबमध्येही सहमालकी आहे. याच क्लबच्या संचालक मंडळावर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली देखील आहेत. त्यामुळे आर्थिक हितसंबंधांचा मुद्दा निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.
आयपीएल स्पर्धेत पुढील मोसमापासून दोन नवे संघ सहभागी होत आहेत. यातील लखनौचा संघ गोयंकांच्या समुहाने विकत घेतला मात्र, त्यामुळे गांगुली यांच्यावरही टीका सुरु झाली. आयपीएल स्पर्धेची संकल्पना अस्तित्वात आणणारे ललित मोदी यांनी देखील याबात टीकेचा सुर लावला होता. त्यामुळेच गांगुलीने बगान फुटबॉल क्लबपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
तसेच जेव्हा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपूष्टात येइल तेव्हा ते पुन्हा क्लबच्या पदावर नियुक्त केले जाऊ शकतात. बीसीसीआय आणि मोहन बागान दोन्हीकडे महत्वाची पदे भूषविणे नियमभंग ठरेल हे लक्षात आल्यामुळेच गांगुली यांनी हा निर्णय घेतला आहे.
सीव्हीसीची मालकीही धोक्यात
अहमदाबादचा संघ विकत घेत सीव्हीसी समुहाने मोठी मजल मारली होती. मात्र, आता ही मालकी धोक्यात आली आहे. या समुहाचा ऑनलाईन बेटिंगसी संबंध असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बीसीसीआय त्यांची मालकी रद्द करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. असे झाले तर अहमदाबाद संघाची मालकी लिलावात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या आदानी समुहाकडे जाण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.