– संरक्षण विभागातील बंगल्यांच्या व्यवहारातील फसवणूक प्रकरणे आणली होती उघडकीस
पुणे : पुणे शहर पोलिसांनी सदर्न कमांडच्या संरक्षण संपदा (डिफेन्स इस्टेटचे) संचालक सौरव रे यांना सशस्त्र सुरक्षा पुरवली आहे. त्यांनी संरक्षण विभागातील बंगल्याच्या व्यवहार प्रकरणातील फसवणूक प्रकरणे बाहेर काढली आहे. त्यांच्या आदेशाने कॅन्टोन्मेंट परिसरातील अंदाजे ३५० कोटी रुपये किमतीचे चार बंगले सील करण्यात आले आहेत. तसेच आणखी पंधरा बंगले डिफेन्स इस्टेट ऑफिसच्या स्कॅनरवर आहेत. रे हे ‘रॉ’ मध्ये प्रतिनियुक्तीवर होते तसेच त्यांनी आदर्श घोटाळा उघडकीस आणला होता.
पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, ‘आम्ही संरक्षण संपदा अधिकारी सौरव रे यांना त्यांच्या मागील कार्यकाळात त्यांनी काम केलेल्या केंद्र सरकारच्या विभागातील संवेदनशील पदांचा आढावा घेतला. यानंतर त्यांच्या विनंतीनुसार त्यांना सुरक्षा म्हणून सशस्त्र पोलीस दिले आहेत. सध्या ते संरक्षण दलातील बंगले सील करण्याचे प्रकरण हाताळत आहेत. त्या संदर्भातच ही सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे, सौरव रे हे १९९४ च्या बॅचचे आयडीईएस अधिकारी आहेत. ते यापूर्वी २००३ ते २०१६ पर्यंंत कॅबिनेट सचिवालय, संशोधन आणि विश्लेषण विंग (राॅ) मध्ये प्रतिनियुक्तीवर होते.
रे ज्यांनी २००१ मध्ये आदर्श घोटाळा उघडकीस आणला होता. तर १९९७ मध्ये अहमदनगर कॅन्टोन्मेंटमधील अत्यंत मौल्यवान संरक्षण जमिनीच्या हस्तांतरणास विरोध केल्याने, त्यांना शिक्षेच्या पोस्टिंगवर श्रीनगर, काश्मीर येथे पाठवले. रे यांनी २०१६ – २०१९ दरम्यान ईस्टर्न कमांड, कोलकाता येथे डिफेन्स इस्टेट्सचे संचालक म्हणून काम केले.
संरक्षण संपदा संचालक म्हणून रे यांची नियुक्ती झाल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने कॅन्टोन्मेंटमधील जुन्या अनुदान बंगल्यांच्या फसवणुकीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश जारी केले. दिनांक सहा डिसेंबर रोजी, रे यांनी प्रथम नोंदणी आणि मुद्रांक महानिरीक्षकांना पत्र लिहून संरक्षण बंगला मालमत्तांची विक्री ताबडतोब थांबवण्यास सांगितले. केंद्र सरकारच्या मालमत्ता खाजगी व्यक्तींना विकल्या जाऊ शकत नाहीत, अशी भूमिका घेतली.
पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये सुमारे ३०० बंगले, काही शाळा आणि क्लब आहेत, जसे की टर्फ क्लब, न्यू पूना क्लब इत्यादी, दोन्ही संरक्षण मंत्रालयाने खाजगी व्यक्तींना किंवा क्लब किंवा शैक्षणिक संस्थांना प्रामुख्याने ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिले आहेत. त्याची मुदत ९० वर्षांपर्यंत वाढवता येते. त्याचप्रमाणे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अखत्यारीत साठ जुने बंगले आहेत.
जून्या बंगल्यांची यादीच…
डिफेन्स इस्टेट ऑफिस (पुणे) यांनी पंधरा जुन्या बंगल्यांच्या मालमत्तांची यादी तयार केली आहे. ज्या मागील काही दशकांमध्ये अत्यंत प्रभावशाली श्रीमंत व्यक्तींना, रिअल इस्टेट विकासकांना विकल्या गेल्या आहेत. संरक्षण संपदा विभागाच्या सुत्रांच्या माहितीनुसार बंगल्यांच्या मालमत्तेच्या अनधिकृत आणि फसव्या विक्रीची चौकशी सुरू आहे.