कोलंबो – श्रीलंका कसोटी क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार बंदुला वर्णपुरा यांचे वयाच्या 68 व्या वर्षी निधन झाले.
या महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती व त्यात त्यांचा पाय गुडघ्याच्या खालून कापावा लागला होता. त्यांना मधुमेहाचा विकार होता. त्यातच त्यांच्या पायाला दुखापत झाली होती व त्यामुळे पायाला गॅंगरीन झाले होते.
या शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती आणखीनच खालावत गेली. श्रीलंका संघाचे ते तंत्रशुद्ध फलंदाज व हुशार कर्णधार अशी त्यांची ख्याती होती. भक्कम फलंदाज व उपयुक्त वेगवान गोलंदाजीतही त्यांनी चांगले यश मिळवले होते.
कसोटी कर्णधार म्हणून त्यांनी 1982 साली श्रीलंका संघाचे नेतृत्व केले होते. त्यांची कारकीर्द मात्र अत्यंत अल्पकालीन ठरली होती. त्यांनी केवळ चार कसोटी सामने खेळले. तसेच 12 एकदिवसीय सामन्यांतही त्यांनी संघाचे प्रतिनिधित्व केले होते.