नाशिक – नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदीचा निर्णय विभागीय आयुक्तांनी घेतला असून त्याबाबतचे आदेश स्थानिक प्रशासनांना देण्यात आले आहेत. 22 ऑक्टोबरपर्यंत अधिसूचना काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी नाशिककरांना फटाक्यांच्या अतिषबाजीविनाच साजरी करावी लागणार आहे. मात्र, या बंदीच्या निर्णयाबाबत व्यापाऱ्यांसह नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील फटाके बंदीला फटाके व्यापारी असोसिएशनने विरोध केला आहे. फटाके व्यवसायात व्यावसायिकांचे लाखो-करोडो रुपये अडकले असून लाखो जणांची उपजीविका यावर अवलंबून आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर फटाके बंदी करणे हा व्यावसायिकांवर अन्याय असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. त्यामुळे फटाके बंदी न उठवल्यास या विरोधात हायकोर्टात जाऊ, मात्र फटाके बंदी होऊ देणार नाही, असा इशारा फटाके व्यावसायिक असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी दिला आहे.