विश्रांतवाडी – पुणे शहरासह धानोरी, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, मुंजाबावस्ती, लोहगाव, कळस, कलवडवस्ती, श्रमिकनगर, खेसेपार्क परिसरात शनिवारी झालेला पाऊस अक्षरश: विध्वंसक ठरला आहे.
परिसरातील शेकडो घरांत पाणी शिरले होते. यामध्ये फ्रीज, टीव्हीसह इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, कपडे, अन्नधान्य, महत्त्वाची कागदपत्रे, शालेय साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक सोसायट्यांत पाणी शिरल्याने पार्किंगमधील वाहनेदेखील पाण्यात गेली.
शिवाय, अनेक घरे आणि सोसायट्यांच्या सीमाभिंती कोसळल्या आहेत. त्यामुळे अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. धानोरीतील परांडेनगर, गोकुळनगरमधील विघ्नहर्ता कॉलनी, मुंजाबावस्ती, लक्ष्मीनगर सोसायटी, तसेच संतोषनगरमधील हनुमान मंदिर परिसर, कळस, माळवाडी येथील नाल्याच्या आजूबाजूचा परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले होते. तसेच धानोरीतील लक्ष्मीनगर, संकल्पनगरी, गंगा आरिया, कळसमधील गंगा कुंज सोसायटी परिसर, कस्तुरबा सोसायटीतील काही इमारतींच्या पार्किंगमध्येही पाणीचपाणी होते.
कायमस्वरुपी तोडगा काढा
धानोरी जकातनाका, मयूर किलबिल, विठ्ठल मंदिर परिसर, लक्ष्मीनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, कलवडवस्तीतील गणराज चौक, लोहगाव रस्त्यावर, मुंजाबावस्तीतील धनेश्वर विद्यालय व “विमान बिल्डिंग’ इत्यादी ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत होते.
सावंत पेट्रोल पंपाकडून आनंदपार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरील हनुमान मंदिर परिसरातील घरांमध्ये व कळसमधील गंगाकुंज सोसायटीमध्येही पाणी शिरले होते. या भागातील नाल्यांचा प्रवाह वळविण्यात आला आहे. त्यामुळे नेहमीच ही समस्या निर्माण होते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
बांधकामांवेळी नालेही बुजवले
लष्कर हद्दीतील दिघी डोंगर परिसरातून धानोरीकडे वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह प्रचंड होता. दिघी डोंगर परिसरातून अनेक छोटे-मोठे नाले धानोरीकडे वाहतात. पण धानोरी, मुंजाबावस्ती परिसरात बांधकामे करताना पाण्याचे नैसर्गिक प्रवाह असलेले नाले अडवण्यात अथवा बुजवण्यात आले आहेत. तसेच पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने पावसाळी लाइन व ड्रेनजलाइन भरून वाहताना दिसत होत्या.
नगरसेवक अनिल टिंगरे ऑनफिल्ड
पाऊस सुरू होण्याच्यावेळी बहुतांश घरांतील पुरुष मंडळी कामावर होती. घरी लहान मुले, वयोवृद्ध व महिला होत्या. पावसाचा जोर कमी होत नव्हता. घरात पाणी वाढत असल्याने सर्वजण भयभीत झाले होते. अशा वेळी सर्व पक्षीयकार्यकर्ते पुढे सरसावले आणि पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढू लागले.
स्थानिक नगरसेवक अनिल टिंगरे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशमन दलाशी संपर्क करून पाचारण केले. स्वतः पाण्यात उतरून नागरिकांना दिलासा दिला.
आमदार सुनील टिंगरेही वाहतूक नियोजनात
आमदार सुनील टिंगरे यांनीही मदतीसाठी सूत्रे हलवली. आमदारांनी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी चक्क वाहतूक नियमन केले. तसेच नगरसेविका रेखा टिंगरे, ऐश्वर्या जाधव, नगरसेवक नाना सांगडे यांनी देखील प्रयत्न केले. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे शशिकांत टिंगरे, विनोद पवार, मनसेचे गणेश पाटील, सचिन आंब्रे, श्रीराम पाटील, कॉंग्रेसचे राजू ठोंबरे, सोनाली ठोंबरे, जितेंद्र कराळेकर यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येत नागरिकांना मदतीचा हात देत धीर देण्याचा प्रयत्न केला.