अंबाला – हरियाणात गुरूवारी भाजप नेत्यांच्या वाहनाची धडक एका शेतकऱ्याला बसली. संपूर्ण देश हादरवरून सोडणारे उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरण ताजे असतानाच ती घटना घडली.
हरियाणातील अंबालाजवळ भाजपच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला पक्षाचे खासदार नायबसिंह सैनी आणि हरियाणाचे मंत्री संदीप सिंह उपस्थित राहिले. केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्याच्या उद्देशातून निदर्शने करण्यासाठी त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी शेतकरी पोहचले.
कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर भाजप नेते तिथून जात असताना त्यांच्या एका वाहनाची धडक एका शेतकऱ्याला बसली. त्यामध्ये शेतकरी किरकोळ जखमी झाला, असा दावा आंदोलक शेतकऱ्यांकडून करण्यात आला. त्या घटनेबाबत शेतकरी आंदोलकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अधिक तपशील न देता तपास सुरू असल्याचे सांगितले.