दुबई -दिल्लीविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार व बेस्ट फिनिशर महेंद्रसिंह धोनी याने केलेल्या संथ फलंदाजीवर चाहते नाराज झाले आहेत. एकेकाळी षटकार फटकावून संघाचा विजय साकार करणारा धोनी संथ फलंदाजी कसा करायला लागला, असा सवालही चाहत्यांनी केला आहे. त्यातच समालोचकांनीही धोनीच्या संथ फलंदाजीवर नाराजी व्यक्त केली आहे.
या लढतीत चेन्नईचे प्रमुख फलंदाज अपयशी ठरत असताना अंबाती रायडूने धोनीसह संघाचा डाव सावरला. रायडूने नाबाद अर्धशतकी खेळी केली. मात्र, धोनीने 18 धावाच केल्या. त्यातही त्याने नेहमीच्या आक्रमकपणे फलंदाजी केली नाही, त्यामुळे त्याची फटकेबाजी पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचा हिरमोड झाला.
धोनीने 18 धावा करण्यासाठी 27 चेंडू खेळले व त्यातही त्याला एकही चौकार फटकावता आला नाही. त्यामुळे धोनीवर सोशल मीडियावर देखील नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी धोनीची बाजू घेतली असून सामन्याची त्यावेळी जी परिस्थिती होती त्यात रायडूला कोणीतरी साथ देणे महत्त्वाचे होते व धोनीने हेच ओळखून फलंदाजी केली, अशा शब्दात फ्लेमिंग यांनी धोनीची बाजू सावरून घेतली.