दुबई – चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने पुढील वर्षाच्या मोसमानंतर आयपीएल स्पर्धेतूनही निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर करत चाहत्यांना आणखी एक धक्का दिला. मात्र, तो आता बॉलिवूडमध्ये नशीब आजमावून पाहणार असल्याच्या वृत्ताचे त्याने खंडन केले आहे. अभिनय हे माझे क्षेत्र नाही, भविष्यातही क्रिकेटशीच जोडलेला राहणार असल्याचा खुलासाही धोनीने केला आहे.
आयपीएलच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना तो चेपॉक स्टेडियमवर खेळणार असून पुढील काळातही क्रिकेटशीच जोडलेला राहणार आहे. अभिनय करणे ते देखील चित्रपटात हे माझे काम नाही. जाहिरातींमध्ये जो काही अभिनय केला जातो तेवढीच माझी क्षमता आहे व मी त्यात आनंदी आहे.
अभिनय करणे सोपी गोष्ट नाही. यापूर्वी देखील मी त्याबात स्पष्टीकरण दिले होते. माझ्या कारकिर्दीवर चित्रपटही प्रदर्शित झाला तेव्हाही मला असे प्रश्न विचारण्यात आले होते. तेव्हापासून मी सातत्याने हेच सांगत आलो आहे, असेही धोनीने सांगितले.
धोनीच्या आयुष्यावर आधारित आलेला “एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता व त्याला प्रचंड लोकप्रियताही लाभली होती. त्या चित्रपटात सुशांतसिंह राजपूत याने धोनीची भूमिका केली होती. आता याच चित्रपटाचा सिक्वेल येत असून त्यात मुख्य भूमिका करणार का असा प्रश्नही धोनीला विचारण्यात आला होता. मात्र, त्याच्या प्रसिद्ध हेलिकॉप्टर शॉटप्रमाणे त्याने हा प्रश्नही लिलया टोलवला.