पुणे – करोनामुळे सुमारे दीड वर्षात शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील फुटबॉलचे खेळाडू, पंच यांच्यासह सर्वच क्षेत्रांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, आता परिस्थिती बदलत आहे. येत्या काळात स्पर्धा, सराव सर्वकाही सुरळीत सुरू होत आहे. आता फुटबॉलचा सर्वांगीण विकास हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे प्रतिपादन पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांनी केले आहे.
संघटनेनी आपली वार्षिक सर्वसाधारण सभा करोनाच्या नियमानुसार ऑनलाइन घेण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी ऑनलाइन उपस्थित असलेल्या संघटनेच्या सर्व सदस्यांशी यावेळी संवाद साधला. संघटनेचे उपाध्यक्ष प्यारेलाल चौधरी यांना सभेच्या अध्यक्षतेची परवानगी दिली.
पीडीएफएचे मानद सचिव प्रदीप परदेशी, सहसचिव सिरील फ्रान्सीस, सदस्य झैनुद्दीन शेख, मॅथ्यु सुसाईनाथन, ए. आर. शेख, निरज चौधरी, रवी बाघसिंग, रत्नदीप रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. संघटनेचे इतर सदस्य थेट व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहभागी झाले होते.
सभेची सुरुवात संघटनेचे सहसचिव परेश पवार व कोविडमुळे जीव गमावलेल्या इतरांना श्रद्धांजली देऊन झाली. परेश पवार यांचे प्रकृती अस्वास्थ्यामुळे 3 मार्च 2020 रोजी निधन झाले होते.
विश्वजीत कदम म्हणाले, आपण सर्वचजण एका कठीण काळातून जात आहोत. या करोना महामारीचा फटका फुटबॉल क्षेत्रालाही बसला आहे. आपल्या सर्वांना आशा आहे की, सर्व परिस्थिती सामान्य होईल आणि फुटबॉल क्षेत्रही सुरळीत होईल. सर्व संलग्न सदस्यांची सुरक्षिततेची गरज लक्षात घेता ही बैठक ऑनलाइन घेण्यात आली होती. सभेमध्ये मुख्य मुद्दे उपस्थित करण्यात आले व ज्यावर चर्चा करण्यात आली. निर्णय घेण्यात आले आणि बहुमताने ते मंजूर करण्यात आले.