पुणे – पीडीएफएकडून सहा क्लबची मान्यता रद्द करण्यात आली आहे. यामध्ये सीएमएस फाल्कन्स्, स्ट्रायकर्स एफ सी, फातिमा इलेव्हन, फिनिक्स एफ सी, जॉली रेंज हिल्स् आणि घोरपडी यंग वन्स् या संघटनांचा समावेश आहे. हा निर्णय बहुमताने घेण्यात आला.
या सहा क्लबच्या सदस्यांनी स्वतंत्र फुटबॉल संघटना स्थापन केल्यामुळे पीडीएफएने ऑगस्टमध्ये झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत त्यांचे सदस्यत्व स्थगित केले होते. संघटनेच्या हिताविरुद्ध प्रतिकूल कृत्यांमुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. अव्वल श्रेणी गट आणि महिला गटाचे साखळी स्पर्धा 2019-20 या कालावधीतील निकाल व गुण रद्दबातल ठरविण्यात आले.
करोना महामागरीमुळे प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणी गटाचे 2019-2020 चे उर्वरित सामने किंवा रद्द केलेले सामने 31 डिसेंबर 2021 पूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
पीडीएफए लीग स्पर्धेसाठीची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात असल्याचा निर्णय घेण्यात आला. संघटनेकडून घेण्यात आलेल्या या निर्णयावर अद्याप या सहाही क्लबकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.