सेऊल, (दक्षिण कोरिया) – उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाची तातडीने दखल घेणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीवर उत्तर कोरियाने थयथयाट केला आहे. संभाव्य निर्बंधांच्या शक्यतेने उत्तर कोरियाने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला गर्भित धमकीच दिली आहे.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची शुक्रवारी तातडीची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमांबाबत चिंता व्यक्त करणारे प्रस्तावित निवेदन फ्रान्सने वितरीत केले होते. उत्र कोरियाने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेणे टाळावे, असे संयुक्त राष्ट्राने पूर्वी म्हटलेले आहे.
त्या ठरावाला बांधील राहण्याची सूचनाही या निवेदनाद्वारे उत्र कोरियाला करण्यात आली आहे. मात्र या बैठकीच्या आदारे उत्र कोरियाने संयुक्त राष्ट्रालाच धमकी दिली आहे. “उत्तर कोरियाच्या सार्वभौमत्वावर अतिक्रमण केले गेले तर भविष्यात त्याचे काय परिणाम होतील, याची संयुक्त राष्ट्राने कल्पना करावी.’ असे उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी जो चोल सू यांनी म्हटले आहे.
उत्र कोरियाने अलिकडेच लघु पल्ल्याच्या क्षेपणास्त्राबरोबरच विमानविरोधी क्षेपणास्त्राचीही चाचणी घेतली आहे. अशाच क्षेपणास्त्रांची चाचणी अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांनीही घेतली आहे. मात्र त्यांच्याविरोधात संयुक्त राष्ट्राने कोणतीही कारवाई केलेली नाही, असे म्हणून उत्तर कोरियाने संयुक्त राष्ट्रावर दुहेरी मापदंड लावण्याचाही आरोप केला आहे.