शिवप्रेमींकडून पानिपतला उभारला जाणार महाराजांचा राजदंडधारी पुतळा
भोर (प्रतिनिधी) – पानिपत (हरीयाणा) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण भोर येथील शिवप्रेमींच्या सहकार्याने रविवारी (दि. 26) होणार आहे. याठिकाणी राजदंडधारी सिंहासनाधिष्ठीत मूर्ती साकारली आहे. सोमवारी (दि. 20) भोर शहरात या पुतळ्याचे जंगी स्वागत करुन मिरवणूक काढण्यात आली.
शेटेवाडी चौपाटी येथे या पुतळ्याचे पूजन जय शिवराय जय भवानीच्या घोषणा देत शेकडो शिवप्रेमींच्या उपस्थित करण्यात आले. पानिपत येथील रोड मराठा समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाधिष्ठीत मूर्ती पुणे येथील शिल्पकार दीपक थोपटे यांनी साकारली आहे.
याकामी भोर शहरासह तालुक्यातील अनेक दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात दिला आहे. सोबत शिवकार्यासाठी तळमळीने अविरत कार्य करणारे शेकडो शिवभक्त या सर्वांच्या मदतीने मूर्ती साकारली आहे.
राजगड, तोरणा, रोहिडेश्वर, केंजळगड त्याबरोबरच अनेक मावळे यांचे भोर, वेल्ह्याच्या मातीतून याच प्रांतातून ज्या ठिकाणी मराठ्यांच रक्त सांडलं, जिथं लढाई हारूनसुद्धा मराठ्यांचा उद्धार आजही जगात अभिमानाने होत आहे. अशा पानिपत (हरियाणा) मध्ये अखंड हिंदुस्थानाचे दैवत आणि स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवण्यात येत आहे.
महाराजांच्या या मूर्तीचे शहरात स्वागत करुन मूर्ती पानिपतकडे रवाना करण्यात आली आहे. रविवारी (दि. 26) सप्टेंबरला भोर तालुक्यातील अनेक शिवभक्तांच्या उपस्थित पानिपत येथे मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.