वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कायम त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष ज्यो बायडेन आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राजकीय प्रतिदंद्वी आहेत. एका पत्रकार परिषदेत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना आखाड्यात आले तर काय होईल? याबाबत सांगितले आहे.
ट्रम्प यांनी इव्हॅंडर होलीफिल्ड आणि व्हिटर बेलफोर्ट यांच्यात होणाऱ्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या सामन्याचे समालोचन डोनाल्ड ट्रम्प करणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा डोनाल्ड ज्यूनिअर पण असणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे 75 वर्षांचे असून बायडेन त्यांच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठे आहेत. यावेळी पत्रकारांनी हा संदर्भ पकडत ट्रम्प यांना प्रश्न विचारला. बॉक्सिंगसाठी तुम्ही कोणाची निवड कराल?. यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले.
माझी बॉक्सिंग रिंगमध्ये जर ज्यो बायडेन यांच्याशी लढत झाली तर मी काही सेकंदातच त्यांना बाद करेन, असे विधान त्यांनी केले. यावेळी त्यांनी ज्यो बायडेन यांच्या जुन्या विधानाची आठवण देखील करून दिली.
दरम्यान, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना डेमोक्रेटिक पक्षाच्या ज्यो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत केले आहे. या निवडणुकीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडिया कंपन्यांनी त्यांची खाती बंद केली होती.