पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव यंदादेखील मुख्य मंदिरामध्येच होणार आहे. तर, भाविकांना ऑनलाइन दर्शन सुविधेसह ऑगमेंटेड रिऍलिटी, या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून भक्तांना घरबसल्या “श्रीं’ची आरती करण्याचा अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून घेता येणार आहे, अशी माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तसेच यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुनील रासने, डॉ.रामचंद्र परांजपे, माणिक चव्हाण, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.
अशोक गोडसे म्हणाले, शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे मंदिर बंद ठेवले आहे. त्यामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. तसेच उत्सवकाळात ट्रस्टचे विश्वस्त आणि कार्यकर्ते मंदिरात जाणार नसल्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे.
ढोल-ताशांना परवानगी नाहीच
गणेशोत्सवात ढोल-ताशा पथकांना स्थिर वादनासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी पथकांकडून केली जात आहे. मात्र, एकीकडे नागरिकांना घरीच साधेपणाने उत्सव साजरे करायला सांगायचा आणि दुसरीकडे वाद्य वादनाला परवानगी द्यायची हे योग्य ठरणार नाही, कारण या वादनावेळी गर्दी जमण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे यावर्षी ढोल-ताशांना परवानगी देणार नसल्याचे पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे यांनी सांगितले.
दररोज 21 किलो मिष्टांन्नाचा भोग दाखविला जाणार
गणेशोत्सवात मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. तसेच दररोज 21 किलो वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईसह मिष्टांन्नाचा भोग “श्रीं’च्या चरणी अपर्ण केला जाणार आहे. अष्टविनायकांची 8 नावे, दगडूशेठ आणि गणाधिश अशी 10 उपरणी तयार करण्यात आली आहे. यातील एक उपरणे दररोज “श्रीं’ना घालण्यात येणार आहे.