पुणे –“करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे गणेशोत्सवात विविध ऑनलाइन सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. दहा दिवसांत तब्बल अडीच लाख लोकांनी हे कार्यक्रम पाहिले. हा मिळालेला प्रतिसाद आणि करोनाची सद्य:स्थिती लक्षात घेत याहीवर्षी “ट्रस्ट’ने ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला असून, विविध बहारदार कार्यक्रम कला रसिकांसाठी सादर केले जाणार आहेत, असे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी सांगितले.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे यंदाही ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असणार असून, दि. 10 ते 19 सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या या महोत्सवात शास्रीय संगीत, कीर्तन, पारंपरिक वाद्यवाजन, चर्चा अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
ट्रस्टतर्फे गुरुवारी (दि.2) आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी उत्सव प्रमुख पुनीत बालन, अध्यक्ष संजीव जावळे, उपाध्यक्ष बाळासाहेब निकम, सचिव दिलीप आडकर, सहसचिव मिलिंद सातव, खजिनदार सूरज रेणुसे आणि विनोद सातव उपस्थित होते.
उत्सव प्रमुख बालन म्हणाले, यंदा सांस्कृतिक महोत्सवात गायक जावेद अली हे प्रथमच मराठीत गायन सादर करणार आहेत. पं. हरिप्रसाद यांना समर्पित कार्यक्रमही सादर करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त “स्वरभास्कर’ हा विशेष कार्यक्रम महोत्सवात सादर होणार आहे. या व्यतिरिक्त महोत्सवात “रंगारी कट्टा’ हा सर्व पक्षीय नेत्यांसोबत चर्चा कार्यक्रमही होणार आहे. या कार्यक्रमांना भार्गवी चिरमुले, स्वानंदी टिकेकर आणि मिलिंद कुलकर्णी यांच्या बहारदार निवेदनाची साथ असणार आहे.