अकोले -प्रेमाच्या जाळ्यात अडकवून गोरख धंदा करणाऱ्या त्या संगमनेरमधील मुलीसह तिच्या आईवर अखेर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील कळस बुद्रुक येथील सुमित मंगेश शिर्के हा युवक त्या मुलीच्या जाळ्यात अडकला होता.
त्याला वारंवार पैशाची मागणी करून या मुलीसह आईकडून मानसिक त्रास दिला जात होता. या हनीट्रॉपला वैतागुन या युवकाने गळफास घेवून गेल्या महिन्यात आत्महत्या केली. या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याने संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील मुली व आई या दोघींवर आज सकाळी अकोले पोलिसात गुन्हा दाखल केला.
सुमित शिर्के संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील एका महिलेच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. या दोघांचे पाच ते सहा महिने प्रेमसंबंध सुरू राहिल्यानंतर या प्रेम प्रकरणातील मुली व तिच्या आईने सुमितकडे पैशासाठी तगादा लावण्यास सुरुवात केली. सुमित हा सिव्हील इंजिनिअर होता. मात्र करोना काळात त्याचे हातचे काम गेले होते.
त्यामुळे त्याच्याकडे जास्त पैसे नव्हते. मोठा भाऊ व त्याची आई देईल तेवढेच मोजके पैसे त्याच्याकडे असत. त्यातच सुमितची प्रेमिका व तिची आई पैशासाठी सातत्याने तगादा लावत असल्याने तो मानसिक तणावाखाली होता. हजार दोन हजार रुपये त्याने अनेकदा आपल्या प्रेमिकेला व तिच्या आईला दिले. मात्र त्यांची पैशाची भूक वाढत गेल्याने सुमितचा तणाव वाढला. त्यातच 8 ऑगस्ट रोजी मुलीच्या आई कळस बुद्रुक येथे त्याच्या घरी आली. तिने त्याच्याकडे व त्याच्या आईकडे 50 हजार रुपयांची मागणी केली.
मात्र सुमितकडे व त्याच्या आईकडे एवढी रक्कम नसल्याने या महिलेने अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तुम्ही जर मला पैसे दिले नाही, तर तुम्हाला कोर्ट कचेऱ्या करायला लावीन. अशी धमकी दिली.
धमकी दिल्याने सुमित हा खूपच मानसिक तणावाखाली गेला. दि.9 ऑगस्ट रोजी सुमितने घरातच गळफास घेवून आत्महत्या केली.मुलाच्या मृत्यूस ती महिला व तिची मुली कारणीभूत असल्याची फिर्याद सविता मंगेश शिर्के यांनी आज पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी फिर्यादीवरून महिला व तिच्या मुलीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 306,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे हे करीत आहेत. उशिरा का होईना या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले जात आहे.
सध्या नगर जिल्ह्यात नागरिकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट झाला आहे. मयत सुमितची आत्महत्या हा देखील त्यातील एक प्रकार आहे. यापूर्वी एपीआय मिथुन घुगे यांनी हनीट्रॅप प्रकरणात संगमनेर शहरातील एका महिलेच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्याच पद्धतीने या महिलेला देखील तात्काळ ताब्यात घ्यावे, अशी मागणी अकोले तालुक्यातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.