मुंबई ( narayan live ) – नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यामध्ये मंगळवारी राजकीय नाट्य रंगलं. राणे यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर ७ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. यानंतर दुपारी त्यांच्यावर अटकेची कारवाई देखील करण्यात आली होती. मात्र राणे यांना मंगळवारी रात्री उशिरा जामीन मंजूर करण्यात आला. जामीन मिळाल्यानंतर राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत मंगळवारच्या घडामोडींवर भाष्य केले.
यावेळी बोलताना राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पूर्वीच्या काही वक्तव्यांचा दाखल देत त्यांच्यावर कारवाई का नाही? असा प्रश्न उपस्थित केला. तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी राणे प्रकरणावर भाष्य करताना राणेंचे संस्कार काढले होते.
आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राणे यांनी, पवार यांना जोरदार टोला लगावला. मुख्यमंत्र्यांच्या प्रसाद लाड, अमित शाह व योगी आदित्यनाथ यांच्यावरील काही वक्तव्यांचा दाखला देत राणे यांनी, ‘काय सुसंस्कृत व्यक्ती बसवलाय?’ असा प्रश्न शरद पवार यांना विचारला.
दरम्यान, आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणं टाळल्याचं दिसलं. यापूर्वी राणे हे वारंवार मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करताना दिसत होते. आज मात्र राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख ‘मुख्यमंत्री महोदय’ असा केला. ( narayan rane live )