पुणे – राज्यात पाच शहरांतील विद्यार्थी पुरामुळे सीए फाउंडेशनची परीक्षा देऊ शकले नाहीत. अशा विद्यार्थ्यांना परीक्षेची एक संधी देण्याचा निर्णय “दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ने (आयसीएआय) घेतला आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
सीए फाउंडेशनची परीक्षा दि.24, 26, 28 आणि 30 जुलै रोजी होत आहे. मात्र, इचलकरंजी, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील प्रतिकूल हवामानामुळे दि. 24 जुलै रोजी होणारी सीए फाउंडेशनची परीक्षा हे विद्यार्थी देऊ शकले नाहीत. त्यामुळे सीए फाउंडशेन पेपर-1 मध्ये अनुपस्थित परीक्षार्थींना संधी देण्यात येणार आहे. मात्र, परीक्षार्थींना दि.26, 28 आणि 30 जुलै रोजी होणाऱ्या फाउंडशेनच्या उर्वरित पेपरसाठी उपस्थित राहण्याचा सल्ला “आयसीएआय’ने दिला आहे. परीक्षेसंदर्भात अद्ययावत माहिती “आयसीएआय’च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.