सातारा -सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी (दि. 25) रात्री उशिरा साताऱ्यात दाखल होणार असून जिल्हा प्रशासनाकडून पूरपरिस्थिती व उपाययोजनांचा ते आढावा घेणार आहेत.
सोमवारी सकाळी आठ वाजता अजित पवार हेलिकॉप्टरने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात जाणार आहेत. दुपारनंतर ते वाई तालुक्यातील पूरग्रस्त भागात भेट देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पाटण तालुक्यातील ढोकावळे, आंबेघर, वाई तालुक्यातील जोर, कोंढवली आदी ठिकाणी भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. जिल्ह्याच्या अनेक भागाला अतिवृष्टीचा फटका बसला.
या पार्श्वभूमीवर प्रशासन करत असलेल्या उपाययोजना, मदतकार्य यांचा आढावा घेण्यासाठी अजित पवार रविवारी रात्री उशिरा सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर दाखल होणार आहेत.
जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल व प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून अजित पवार आढावा घेणार आहेत.
आज सकाळी आठ वाजता अजित पवार हेलिकॉप्टरने सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या पूरपरिस्थितीची पाहणी करणार आहेत.
तेथून पवार वाई येथे येणार असून तालुक्यातील कोंढावळे गावास ते भेट देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. पाटण तालुक्यातील बाधित गावांना अजित पवार जाणार की नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही.