नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्षाने विदेशातील आपल्या शाखांच्या प्रमुखांच्या नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. कॉंग्रेसच्या ओव्हरसीज विभागाचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी या नियुक्त्या घोषित केल्या आहेत. त्यानुसार नॉर्वे देशातील कॉंग्रेस संघटनेच्या प्रमुख पदी गॅरीसोबर सिंग गिल यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. ते आता इंडियन ओव्हरसीज कॉंग्रेसच्या नॉर्वे शाखेचे प्रमुख म्हणून काम पाहतील.
ते म्हणाले की, आमच्या पक्षाच्या विचारधारेचे येथे अनेक समर्थक आहेत. गिल हे नॉर्वेत एक बिअर उत्पादन करणारी कंपनी चालवतात. त्यांचे वडील गुरमेल गिल हे भारताचे माजी राष्ट्रीय फुटबॉलपटू होते. गॅरीसोबर सिंग यांनी म्हटले आहे की, आमचे वडील आयुष्यभर कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यांची जबाबदारी आता मी पार पाडत आहे.
35 वर्षीय वैज्ञानिक कोमलकुमार जवराप्पा यांची फिनलंडमधील कॉंग्रेस शाखेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते मॉलेक्युलर बॉयलॉजीचे वैज्ञानिक आहेत. कॉंग्रेसच्या विचारसरणीने आपण आकृष्ट झालो असून, मी फिनलंडमध्ये पक्षाचे काम करण्याची इच्छा व्यक्तकेली. त्यानुसार मला ही जबाबदारी मिळाली आहे असे त्यांनी म्हटले आहे.
युरोपातील विविध देशांच्या शाखांचे निमंत्रक म्हणून रविंदरसिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अन्य नियुक्त्यांमध्ये इटलीचे प्रमुख म्हणून दिलबाग चन्ना, स्वित्झर्लंडचे प्रमुख म्हणून जॉय कोचाट्टु, स्वीडन शाखेच्या प्रमुख म्हणून सोनिया हेल्डस्टेड, ऑस्ट्रियाचे प्रमुख म्हणून सुनील कोराह, बेल्जियमचे प्रमुख म्हणून सुखीवन प्रीत सिंग, हॉलंडचे प्रमुख म्हणून हरपिंदरसिंग घाग, पोलंडचे प्रमुख म्हणून अमरजितसिंग यांच्या नियुक्त्या सॅम पित्रोदा यांनी आज जाहीर केल्या.