जम्मू – दहशतवाद्यांना केल्या जात असलेल्या आर्थिक मदतीच्या संबंधात एनआयएने जम्मू काश्मिरात आज अनेक ठिकाणी छापे घातले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ऑनलाइन पद्धतीने काही धार्मिक कट्टरवादी संस्था भारतात जम्मू काश्मिरात धर्मांतराचे प्रयत्न करीत असल्याची बाब समोर आली असून, त्या अनुषंगाने ही कारवाई केली जात आहे.
या कामासाठी विदेशातून पैसा पुरवला जात असल्याचेही समोर आल्याने त्या मदतीवर जम्मू काश्मिरातील जे घटक धर्मांतराच्या प्रक्रियेत कार्यरत आहेत, त्यांचा शोध घेतला जात आहे, असेही त्यांनी नमूद केले. एनआयएला या कारवाईत रॉ आणि गुप्तचर विभागाचे अन्यही अधिकारी मदत करीत आहेत.
या संबंधात काही जणांना चौकशीसाठी ताब्यातही घेण्यात आल्याचे वृत्त आहे. श्रीनगर, अनंतनाग आणि बारामुल्ला या जिल्ह्यांमध्ये ही छापेमारी केली जात आहे. जम्मू काश्मीरच्या सरकारी सेवेत असलेले काही कर्मचारी आणि कुख्यात दहशतवादी सय्यद सलाउद्दीन याच्या दोन मुलांना या प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे.