पुणे – दांडेकर पुलाजवळील आंबिल ओढा येथे अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. या प्रकरणाची राज्य शासनाने चौकशी करुन दोषींवर कारवाई केली पाहिजे, असे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी स्पष्ट सांगितले आहे.
वसाहतीतील नागरिकांशी डॉ. राऊत यांनी संवाद साधला, त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, दीप्ती चवधरी, अभय छाजेड, सचिन साठे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
“पावसाळा सुरू असताना चुकीच्या पद्धतीने घरे पाडण्यात आली. घरातील साहित्य फेकण्यात आल. महिलांवर अन्याय करण्यात आला. हा सर्व प्रकार चुकीचा आणि वेदनाजनक आहे,’ असे राऊत यावेळी म्हणाले.
भाजपचे मनपातील पदाधिकारी घटनास्थळी फिरकले नाहीत. वरिष्ठांकडेही या प्रकरणाबाबत तक्रार करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे. घरे पाडताना महावितरणने वीज तोडली नव्हती. महापालिकडून कारवाई सुरू असताना ती तुटल्याचेही राऊत म्हणाले. दरम्यान, यानंतर डॉ. राऊत यांनी पालिका आयुक्तांचीही भेट घेत या प्रकरणी दोर्षीवर कारवाईची मागणी केली.