नवी दिल्ली/ लखनौ – आयएसआयच्या निधीतून सुमारे एक हजार जणांना जबरदस्तीने धर्मांतर करायला लावल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश पोलिसांनी दोन जणांना दिल्लीतून अटक केली. उमर गौतम आणि जहांगीर या दोघांनी मुस्लिमेतरांना मुस्लीम बनवल्याचा संशय आहे.
दोघांपैकी एक आरोपी जामियानगरमधील बटाला हाऊस येथील रहिवासी असून त्याने स्वत: धर्म बदललेला आहे. या कारवाईची माहिती उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, राज्यात जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्याचे रॅकेट कार्यरत होते. त्यात आतापर्यंत सुमारे एक हजार जणांना त्या धर्मात धर्मांतरित केले आहे.
हे दोघे गरीब कुटुंब, बेरोजगार युवक आणि दिव्यांग व्यक्ती विशेषत: मूकबधिर, मुले यांना हेरत असत त्यांना जबरदस्तीने मुस्लीम बनवत. पैसा आणि आर्थिक आमिषाच्या उद्देशाने लोक धर्मांतरित होत असत, असे कुमार यांनी स्पष्ट केले.
या धर्मांतरासाठी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयकडून निधी मिळत असण्याची शक्यता असल्याचे हे प्रकरण आहे. अनेक महिलांना जबरदस्तीने धर्मांतर करून त्याचा विवाह लावून देण्यात आल्याचे समोर येत असल्याचे प्रशांत कुमार यांनी सांगितले. हे रॅकेट नोएडा, कानपूर आणि मथुरेत कार्यरत होते. यासाठी जगभरातून निधी उभा करण्यासाठी त्यांनी इस्लामिक दवा सेंटर नावाची संस्था उभी केली होती.
या रॅकेटमध्ये सापडलेल्या लोकांचा शोध घेण्यात येत आहे. याच्या तपासात ते लोकांवर कसा प्रभाव टाकत हे उघड होत असत, हे स्पष्ट होईल.