देहरादून – उत्तराखंड सरकारने करोनासंसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये 29 जूनपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे चारधाम यात्रा एक जुलैपासून सुरू करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
उनियाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक भाविकांसाठी एक जुलै तर परराज्यातील भाविकांसाठी 11 जुलैपासून यात्रा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चारधाम यात्रेची रुपरेषा –
- एक जुलैपासून बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिर दर्शनासाठी स्थानिकांना मुभा
- 11 जुलैपासून सर्व राज्यांतील भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले
- दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना करोना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य
अमरनाथ यात्रा रद्द –
जम्मू काश्मिरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे. लोकांचा जीव वाचवणे महत्वाचे असल्यामुळे ही यात्र रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या वर्षीही करोनामुळे अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी भाविकांना बाबा बर्फानीचे दर्शन घेता येणार नाही.