नवी दिल्ली : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला होता त्यावेळी देशातील अनेक राज्यामध्ये करोना प्रतिबंधक लसच उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद असल्याचे दिसून आले.
तर दुसरीकडे करोना संकटावर मात करण्यासाठी पुढील काही काळात अनेक लसी उपलब्ध होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, लसीबाबत जनतेच्या मनात अनेक प्रश्न घोंघावत आहेत. काही ठिकाणी लस घेण्यास जनतेने नकार दर्शविला आहे. मात्र देशात करोना आजारावर मात करण्यासठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. यातच जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील वेयान हॅमलेट हे गाव देशातलं लसीकरण करण्यात पहिलं गाव ठरलं आहे. सध्या या गावाचे कौतुक सर्वत्र होत आहे.
याबाबत वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, बांदीपोरा जिल्हा मुख्यालयापासून वेयान हे गाव २८ किमी अंतरावर आहे. या गावात लसीकरणाची मोहीम राबविण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना तब्बल 18 किलोमीटरपर्यंत चालत जावं लागतं तसेच गावात इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे येथील लसीकरण मोहिम जम्मू-काश्मीर मॉडेलच्या अंतर्गत करण्यात आली. या मोहिमेत एकूण 362 वयस्क लोकांना लस देण्यात आली. ही लसीकरण मोहीम आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे आणि जिद्दीमुळे हे शक्य झालं आहे.