नवी दिल्ली – गेल्या काही आठवड्यांमध्ये देशाच्या बऱ्याच मोठ्या शहरात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे सेवा क्षेत्रावरही परिणाम होत आहे. सेवा क्षेत्राच्या उत्पादकतेच पीएमआय निर्देशांक म्हणजे पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स मे महिन्यामध्ये केवळ 46.4 टक्के भरला आहे.
आठ महिन्यात पहिल्यांदाच हा निर्देशांक 50 पेक्षा कमी पातळीवर गेला आहे. त्यामुळे हा निर्देशांक 50 अंकांच्या वर जाण्यासाठी या उद्योगाला आणि सरकारला मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागणार आहेत.
देशांतर्गत मागणी बरोबरच परदेशातून होणाऱ्या मागणीवरही वाहतुकीतील अडथळ्यामुळे परिणाम झाला आहे. रोजगार निर्मितीवर या आकडेवारीचा परिणाम झाला असल्याचे हा निर्देशांक तयार करणाऱ्या आयएचएस मार्किट या संस्थेने म्हटले आहे.
गेल्याच आठवड्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा निर्देशांकही कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली होती. या आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. त्यावेळी या आकडेवारीवर विचार करण्यात येणार असल्याचे समजले जाते.
मात्र दरम्यानच्या काळामध्ये बरेच निर्बंध कमी झालेले आहेत. त्यामुळे आगामी काळात निर्देशांक हळूहळू वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.