जिनिव्हा – भारतात सर्वप्रथम आढळलेला कोविड-19 विषाणूचा बी.1.617 हा प्रकार आता 53 देशांमध्ये आढळून येत आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आली आहे.
गेल्या सात दिवसांत भारतात करोनाच्या नव्या प्रकरणांमध्ये 23 टक्क्यांची घट झाली आहे. मात्र तरीही ही संख्या जगात सर्वाधिक असल्याचेही या संघटनेने नमूद केले आहे.
गेल्या आठवडाभरात करोनाची नवीन प्रकरणे आणि करोनामृत्यू यांची संख्या जगभरात कमी होऊन 4 कोटी 1 लाख नवी प्रकरणे आणि 84 हजार मृत्यूंची नोंद करण्यात आली.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत हे प्रमाण अनुक्रमे 14 टक्के व 2 टक्क्यांनी कमी आहे, असे 25 मे रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या डब्ल्यूएचओच्या महासाथविषयक ताज्या आकडेवारीत म्हटले आहे.
बी.1.617 विषाणू हे बी.1.617.1, बी.1.617.2 आणि बी.1.617.3 अशा तीन वंशात (लायनेज) विभागलेले आहेत. “हू’च्या आकडेवारीत बी.1.617 प्रकाराच्या तीन वंशांच्या निरनिराळ्या देशांत आणि भागांत 25 मे रोजी असलेल्या अस्तित्वाची माहिती देण्यात आली आहे.
त्यानुसार बी.1.617.1 हा 41 देशांमध्ये, तर बी.1.617.2 हा 54 देशांमध्ये आणि बी.1.617.3 हा 6 देशांमध्ये आढळून आला आहे. याशिवाय बी.1.617.1 व बी.1.617.2 या वंशांबाबतची माहिती चीनसह 11 देशांतील अनधिकृत सूत्रांकडून मिळाली असून, अधिक माहिती उपलब्ध झाल्यानंतर तिचा आढावा घेतला जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने बी.1.617 ला विषाणूचा “चिंताजनक प्रकार’ म्हणून जाहीर केले आहे.