नवी दिल्ली : करोनाच्या तिसऱ्या लाटेने देशात एकच धुमाकूळ घातला आहे. त्यातच ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा धोकाही देशात मोठ्या प्रमाणात वाढला. मात्र या सगळ्यादरम्यान सुद्धा लसीकरण मोहीम निरंतरपणे सुरू राहिली. आता देशाने लसीकरणाचा मोठा टप्पा गाठला असून या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
देशातल्या ७५ टक्के प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झाले आहे. हा टप्पा गाठल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे अभिनंदन केले आहे. याविषयी एक ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, “देशातल्या ७५ टक्के प्रौढ लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झालं आहे. या विक्रमशाली कामगिरीबद्दल मी देशवासियांचं अभिनंदन करतो.लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी कार्यरत असलेल्या सर्वांचा मला अभिमान वाटतो.
75% of all adults are fully vaccinated.
Congratulations to our fellow citizens for this momentous feat.
Proud of all those who are making our vaccination drive a success. https://t.co/OeCJddtAL8
— Narendra Modi (@narendramodi) January 30, 2022
देशातल्या ७५ टक्के प्रौढ लोकसंख्येचं करोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही डोससह लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनीही अभिनंदन केलं आहे.
‘सबका साथ, सबका प्रयास’ के मंत्र के साथ, भारत ने अपनी 75% वयस्क आबादी को वैक्सीन की दोनों डोज लगाने का लक्ष्य हासिल कर लिया है।
कोरोना से लड़ाई में हम निरंतर मज़बूत हो रहें है। हमें सभी नियमों का पालन करते रहना है और जल्द से जल्द वैक्सीन लगवानी है। #SabkoVaccineMuftVaccine pic.twitter.com/wSBg9AQphx
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) January 30, 2022
आपल्या ट्वीटमध्ये मांडवीय म्हणतात, सबका साथ, सबका प्रयास या मंत्राच्या साहाय्याने भारताने ७५ टक्के प्रौढ लोकसंख्येचं करोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही डोससह लसीकरण पूर्ण झालं आहे. आपण करोनाविरुद्धच्या या लढ्यात अधिक शक्तीशाली होत आहोत. आपल्याला करोना प्रतिबंधाच्या नियमांचं पालन करायला हवं, तसंच जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवं.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, केंद्राने आत्तापर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना १६४ कोटी ३६ लाख ६६ हजार ७२५ लसमात्रा मोफत पुरवल्या आहेत. अजून १२ कोटी ४३ लाख ४९ हजार ३६१ लसमात्रा केंद्राने राज्यांना देणं बाकी आहे.