वॉशिंग्टन – भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी आज अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुईल्लिवन यांच्याशी चर्चा करून विविध क्षेत्रातील सहकार्याचा आढावा घेतला. यावेळी आम्ही इंडो-पॅसिफिक आणि अफगाणिस्तान या क्षेत्राच्या स्थितीवरही चर्चा केली, असे जयशंकर यांनी म्हटले आहे.
कोविड लसींच्या संबंधात आज भारत आणि अमेरिकेच्या सहाकार्याला विशेष महत्त्व आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांतील नागरिकांचे एकमेकांशी असलेले श्रृणानुबंध आणि आमची मूल्ये हाच अमेरिका आणि भारत यांच्यातील मैत्रीचा आधार आहे. त्याच आधारे आम्ही कोविडच्या आव्हानांसह आमच्यापुढील अन्य आव्हानांचा मुकाबला करू, असेही जयशंकर यांनी म्हटले आहे.
कोविड काळात अमेरिकेकडून भारताला 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मदत मिळाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.