मंचर -अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शासकीय तंत्रनिकेतन-मध्ये 24.24 कोटी रुपये खर्च करून 288 ऑक्सिजन बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारण्याबाबत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे;
मात्र रूग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या दृष्टीने विचार करून आंबेगावसह जुन्नर, खेड, शिरूर या तालुक्यांसाठी प्रत्येकी स्वतंत्र 12 आयसीयू बेडसह 75 ऑक्सिजन बेडचे छोटेखानी जम्बो कोविड सेंटर उभारण्यात यावे,
अशी मागणी शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विभागीय आयुक्त सौरव राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली.
भौगोलिकदृष्ट्या तालुकानिहाय विचार केला असता खेड, जुन्नर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात वैद्यकीय सुविधांची वाणवा आहे.
त्यामुळे अवसरी येथे येण्यासाठी 60 ते 70 तर शिरूर तालुक्यातील तांदळी, तांदळी, मांडवगण फराटा, इनामगाव, शिरसगाव काटा यासारखी अनेक गावे अवसरीपासून सुमारे 90 ते 100 किमीचा प्रवास करून अवसरीत येणे शक्य होणार नाही.
त्यामुळे जुन्नर, खेड व शिरूर या तीनही तालक्यांना या सेंटरचा फारसा उपयोग होणार नाही.
त्यामुळे 24.24 कोटी निधीचा योग्य वापर करावयाचा झाल्यास चारही तालुक्यांसाठी प्रत्येकी 75 ऑक्सीजन त्यापैकी 12 आयसीयू बेड
असेलले स्वतंत्र छोटेखानी जम्बो कोविड सेंटर उभारल्यास त्याचा त्या-त्या तालुक्यातील लोकांना अधिकचा फायदा होऊन रूग्णाला रूग्णालयात दाखल करण्यासाठी लागणाऱ्या वेळेत मोठी बचत होईल.
वेळेवर उपचार मिळाल्यास गंभीर रूग्णांचा जीव वाचण्यास मदत होऊ शकेल. मोठ्या जम्बो सेंटरपेक्षा छोट्या जम्बो सेंटरची उपयुक्तता व कार्यक्षमता अधिक असल्याचे वेळोवेळी दिसून आल्याचे आढळराव पाटील यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.