पुणे – करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होण्याची भीती आहे. त्यामुळे आता दळवी हॉस्पिटलपाठोपाठ जम्बो कोविड हॉस्पिटलमध्येही लहान मुलांसाठी 20 बेड तयार ठेवले जाणार आहेत. त्यात 10 आयसीयू आणि दहा ऑक्सिजन बेड असणार आहेत. त्यासाठी बालरोग तज्ज्ञांची नियुक्ती केल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली.
खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेनेही तयारी सुरू केली आहे. यात येरवड्यातील स्व. राजीव गांधी हॉस्पिटल येथेही बेड असतील. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते लहान मुलांना व्हेंटिलेटरची गरज भासण्याची शक्यता प्रौढांच्या तुलनेत कमी आहे. मात्र, ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासू शकते. असे असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आता पासूनच तयारी सुरू आहे.
व्हेंटिलेटरचे सॉफ्टवेअर बदलणार
येथील 5 व्हेंटिलेटर मुलांसाठी वापरण्यापूर्वी त्यांचे सॉफ्टवेअर बदलावे लागणार आहे. या व्हेंटिलेटरवर इतर रुग्ण असल्याने तसेच पुढेही प्रौढ रुग्ण येणारच असल्याने सर्वच व्हेंटिलेटर मुलांसाठी वापरता येणार नाहीत. त्यामुळे तूर्तास 5 व्हेंटिलेटर तयार ठेवले जाणार आहेत.