पुणे – तौक्ते चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीवरून पुढे सरकले असले तरी आद्यपही वादळाचा प्रभाव राज्यातील बहुतांश भागावर आहे. परिणामी, पुणे शहर आणि परिसरात बुधवारी (दि.19) पावसाने पुन्हा हजेरी लावली. उन्हाळ्याचा मे महिना असला तरी या वादळाच्या प्रभावातून पुढील चार दिवस शहरात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
अरबी समुद्रात घोंगावणाऱ्या तौक्ते या चक्रीवादळामुळे 16 ते 18 मे या काळात देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील केरळ ते गुजरात अशा पाच राज्यांना वादळाचा तडाखा बसला. या वादळामुळे निर्माण झालेल्या बाष्पमुळे अजूनही राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे.
पुणे शहर आणि परिसरातही बुधवारी दिवसभरात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. शहरातील येरवडा, लोहगाव, पाषाण, बाणेर, बालेवाडी, धायरी, सिंहगड रस्ता, शिवाजीनगर अशा विविध भागात पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार, पुण्यासह मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान लक्षणीय घट झाली आहे.