वाघोली, दि.१८ (प्रतिनिधी): महाराष्ट्रात खेडोपाडी लोककलावंतांचा लोकनाट्य तमाशा अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे दरवर्षी आयोजन गावोगावी केले जाते. मात्र गेल्या दोन वर्षापासून covid-19 वाढत्या प्रादुर्भावामुळे लोककलेचे कोणतेही कार्यक्रम होत नसल्याने लोककलावंत मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
या लोककला जोपासण्यासाठी लोककलावंतांना खऱ्या अर्थाने मदत करण्याची वेळ आली असून अनेक गावोगावच्या यात्रा कमिट्या, देवस्थान तसेच सांस्कृतिक समिती यांनी मदतीचा हात पुढे करून आर्थिक संकटात सापडलेल्या लोककला आणि लोककलावंत वाचवण्यासाठी मदत करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश सचिव संदीप थोरात यांनी केले आहे.
राष्ट्रवादीचे नेते संदीप थोरात यांनी सांगितले की सांस्कृतिक समिती अथवा यात्रा कमिटी यांनी दरवर्षी भरवण्यात येणारे लोक कलेचे प्रकार अथवा सांस्कृतिक कार्यक्रम यांच्या कार्यक्रमाच्या अनामत रकमा संबंधित सांस्कृतिक कार्यक्रम व लोककला प्रमुखाकडे जमा करून त्यांच्याशी योग्य तो कायदेशीर करार करून लोक कलावंतांसाठी मदतीचा हात पुढे करावा.
लोककलेच्या माध्यमातून लोक कलावंतांनी करमणूक करून नागरिकांच्या जीवनात हास्याची लकेर आणली आहे. covid-19 वाढत्या प्रादुर्भावामुळे लोककलावंतांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
लोककलावंतांना त्यांच्या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन संदीप थोरात यांनी गावोगावच्या यात्रा प्रमुखांना केले आहे.