निफ्टी पुन्हा 15 हजारांवर

जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश

मुंबई – जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश येण्याबरोबरच देशातील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असल्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे मंगळवारी जोरदार खरेदी होऊन निर्देशांक मानसिक दृष्टया महत्त्वाच्या पातळीच्या वर गेले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टि 15,000 अंकाच्या वर जाऊन बंद झाला. त्याचबरोबर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 50 हजार अंकाच्या वर जाऊन बंद झाला. 

बाजार बंद होताना निफ्टी कालच्या तुलनेत 1.24 टक्‍क्‍यांनी म्हणजे 184 अंकांनी वाढून 15,108 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्‍स कालच्या तुलनेत 612 अंकांनी वाढून 50,193 अंकांवर बंद झाला.

मुख्य निर्देशांकाशी संबंधित एचडीएफसी बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात भक्कम वाढ झाल्यामुळे निर्देशांकांना चांगला आधार मिळाला. त्याचबरोबर महिंद्रा, बजाज ऑटो, बजाज फायनान्स, पावर ग्रिड या कंपन्यांच्या शेअरच्या भावात मंगळवारी भरगोस वाढ झाली.

मात्र भारती एअरटेल, आयटीसी, डॉ रेड्डीज, स्टेट बॅंकेला विक्रीचा मारा सहन करावा लागला. या बाबत बोलताना रिलायन्स सिक्‍युरिटी विश्‍लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात भारतातील मोठ्या शहरातील करोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याची आकडेवारी समोर येत आहे. त्याच बरोबर आशियाई, युरोपियन बाजारातून सकाळी सकारात्मक संदेश आल्यानंतर गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली.

रुपयाचा भाव वाढत असल्यामुळे गुंतवणूकदार खरेदी करीत आहेत. त्याचबरोबर जागतिक बाजारात क्रुडचे दर वाढत असल्यामुळे आता जागतिक आर्थिक परिस्थिती रुळावर येण्याची लक्षणे दिसत असल्याचे गुंतवणूकदारांना वाटत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.