पुणे(प्रतिनिधी) – एकमेकांकडे बघण्यावरून झालेल्या वादातून मित्रांना बोलावून घेत शेजारी राहणार्यास लोखंडी पाईपने मारहाण करणार्यास दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला 15 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. आरोपींच्या मारहाणीत दोन हात आणि डावा पाय फ्रॅक्चर झाला होता. मागील सात महिन्यापासून आरोपी फरार होता.
शिवम उर्फ शुभम राहुल शिंदे (वय 24, रा. विघ्नहर्ता बिल्डिंग शेजारी, सिंहगड रोड, सध्या बाजारे मळा, वडकीगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह मलकेश उर्फ गणेश भिकाजी कांबळे (वय 26 ) आणि अविनाश भिकाजी कांबळे ( वय 32, दोघे रा. सिंहगड रस्ता) विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
निलेश सुरेश जोगदंड (वय 32, रा. राजीव गांधीनगर, साने गुरूजी शाळेसमोर दांडेकर पूल) याने फिर्याद दिली आहे. सिंहगड रस्ता परिसरात पंचतारा बिल्डिंग समोर 7 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री साडेनउ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
फिर्यादी निलेश हा त्यांच्या घरासमोर आईसोबत बोलत उभा होता. त्यावेळी त्याचे शेजारील इमारती मध्ये राहणारा शुभम शिंदे याने फिर्यादीजवळ येवून माझ्याक डे काय बघतोस असे बोलून वाद घातला. तसेच अविनाश आणि गणेश कांबळे ला बोलावून घेत लोखंडी पाईपने मारहाण केली. त्यामध्ये निलेश याचे दोन्ही हात व डावा पाय फ्रॅक्चर झाला.
अटक आरोपी शिवम शिंदे हा अभिलेखावरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात वारजे आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीने जबर मारहाणीत फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, मोठी शारिरीक हानी झाली आहे.
गुन्हा झाल्यापासून आरोपी फरार होता. गुन्ह्यांत वापरलेला लोखंडी पाईप जप्त करणे व तपासासाठी त्याला पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सहायक सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केली.