महागाई वाढण्याची शक्‍यता; शेअर बाजार निर्देशांकावर परिणाम

मुंबई – जागतिक पातळीवर महागाई वाढण्याची शक्‍यता गृहीत धरली जाऊ लागले आहे. त्यामुळे काही देशांच्या रिझर्व्ह बॅंका व्याजदरात वाढ करण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. या कारणामुळे जागतिक शेअर बाजारात विक्रीचे वातावरण होते. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला असल्याचे दिसून आले.

गुरुवारी बाजार बंद होताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 1.04 टक्‍क्‍यांनी म्हणजे 154 अंकांनी कमी होऊन 14,696 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 471 अंकांनी कमी होऊ 48,690 अंकांवर बंद झाला.

आयसीआयसीआय बॅंक, हिंदुस्तान युनिलिव्हर, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बॅंक, ओएनजीसी, ऍक्‍सिस बॅंक, कोटक बॅंक, महिंद्रा, टेक महिंद्रा या कंपन्या आज विक्रीचा मारा सहन करावा लागला. या पडत्या काळातही मारुती सुझुकी, टायटन, स्टेट बॅंक, एनटीपीसी या कंपन्यांना खरेदीचा फायदा झाला.

जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, गेल्या वर्षी विविध देशांच्या रिझर्व्ह बॅंकांनी मोठ्या प्रमाणात भांडवल सुलभता निर्माण केल्यामुळे महागाई वाढणार हे स्पष्ट होते. आता ती वेळ आली आहे. त्यामुळे ही महागाई रोखण्यासाठी व्याजदरात वाढ होण्याची शक्‍यता जागतिक पातळीवर व्यक्त केली जात आहे. त्याचा परिणाम शेअर बाजार निर्देशांकांवर होत आहे.

भारतीय शेअर बाजारात आज झालेली विक्री इतकी जास्त होती की धातू क्षेत्रासह बहुतांश क्षेत्राच्या निर्देशांकात घट झाली. करोनाचे रुग्न वाढत असतांना नागरिकासाठी पुरेशी लस नाही. या कारणामुळे अनिश्चित परिस्थिती निर्माण झाली असतानाच जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश झाल्यामुळे बुधवारी निर्देशांक कोसळले असे विश्‍लेषकांनी सांगितले.

आज रुपयाचा भावही आठ पैशांनी कमी होऊन 73.42 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला. त्यामुळे निर्देशांकांना आधार मिळू शकला नाही. गुंतवणूदारांच्या दृष्टीकोनातून आणखी एक चिंतेचा विषय म्हणजे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार विक्री करीत आहेत. मंगळवारी या गुंतवणूकदारांनी 336 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. परदेशी गुंतवणूकदारांनी विक्री केल्यानंतर देशातील संस्थागत गुंतवणूकदार आणि इतर गुंतवणूकदारही विक्री करण्याच्या मनस्थितीत येतात. त्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना आकर्षित करणे सध्या महत्त्वाचे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.