पिंपरी – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीची कागदपत्रे व कामकाजात मराठी भाषेचा शक्य त्या ठिकाणी जास्तीत जास्त वापर करून कामकाज करणे अनिवार्य असल्याचे महापालिका आयुक्त व कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी नमूद केले आहे. त्यांनी त्याबाबतचे आदेश नुकतेच दिले आहेत.
जागृत नागरिक महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष नितीन यादव यांनी स्मार्ट सिटी कंपनीच्या कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्यात यावा, अशी मागणी केली होती. स्मार्ट सिटी कंपनीचा करारनामा इंग्रजी भाषेत आहे. तसेच, अनेक बाबी इंग्रजीत नमूद आहेत. राज्य सरकारच्या 30 एप्रिल 1966 च्या अधिसूचनेनुसार सर्व शासकीय प्रयोजनासाठी मराठी भाषा वापरणे 1 मे 1960 पासून अनिवार्य करण्यात आले आहे.
ही बाब यादव यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली होती. केंद्र सरकारतर्फे स्मार्ट सिटी कंपनीशी इंग्रजीमधून पत्रव्यवहार केला जातो. त्यानुसार त्यांच्याशी इंग्रजीत पत्रव्यवहार करणे क्रमप्राप्त आहे. तसेच, कंपनीचे कामकाज हे शक्य तेवढे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांनुसार करून त्यानुसार दोन्ही भाषांमध्ये कागदपत्रे ठेवण्यात यावी. स्मार्ट सिटीचे अधिकारी, कर्मचारी वर्गास मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे अनिवार्य असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.