पुणे -करोना, लॉकडाऊनमुळे पालकांची आर्थिक स्थिती खालावलेली असताना खासगी शाळांनी फी वसुलीचा तगादा लावला आहे. या मनमानीविरुद्ध सावित्री सन्मान फाउंडेशन व विविध शाळांचे पालक प्रतिनिधी दि.17 मे रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत.
फाउंडेशनच्या संस्थापक सोनल कोद्रे, सहसचिव वर्षा ऊनउणे यांच्या नेतृत्वाखाली काही शाळांचे पालक प्रतिनिधी एकत्र येऊन हे आंदोलन करणार आहेत. खासगी शाळांची फी वसुली आणि ऑनलाइन शिक्षण पद्धती हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची वेळ आहे. खासगी शाळा या करोना महामारीमध्येही 100 टक्के फी वसुलीसाठी आग्रही आहेत. या शाळांना थोडेही सामाजिक भान, नैतिकता राहिलेली नाही. ऑनलाइन शिक्षणामुळे शाळांचा खर्च कमी झालेला आहे.
पालकांनी काही ना काही फी भरलेली असतानाही विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी लिंक न पाठवणे अथवा त्यांना पासवर्ड न देणे, ऑनलाइन परीक्षा न घेणे, निकालपत्र न देणे, विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करणे असे प्रकार शाळांकडून होत आहेत. या ऑनलाइन शिक्षणपद्धती मुळे पालकांचे खर्च वाढलेले आहेत. इंटरनेट सुविधा पुरवणे, लॅपटॉप, मोबाइल ऑनलाइन शिक्षणासाठी मुलांना पुरवणे यामुळे पालकांच्या खिशाला कात्री लागलेली आहे.
पालक म्हणतात…
फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबवू नये, जेवढा खर्च तेवढीच फी हे धोरण शाळांनी राबवावे, ऑनलाइन शिक्षण व फी याबाबत शाळांची नियमावली अथवा मार्गदर्शिका शासनाने जाहीर करावी, शाळांचे मागील तीन वर्षांचे ऑडिट करुन त्यात दोषी आढळणाऱ्या शाळांना कोणत्याही प्रकारची मुभा न देता कायदेशीर कारवाई करावी, पारदर्शकपणे पालक व शिक्षक संघटना स्थापन कराव्यात आदी मागण्या शालेय शिक्षणमंत्र्यांसह सर्व स्तरावर करण्यात आलेल्या आहेत. पण, शिक्षण अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे मागण्यांकडे पुन्हा शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.