देशातील कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस अत्यंत भयावह होत चालली आहे. राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राची अवस्था अत्यंत बिकट आहे. लोकांची प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी लसीकरण मोहीम राबविली जात आहे. लसीकरण मोहीम वेगवान होण्यासाठी मुंबईत ‘ड्राईव्ह इन वॅक्सिनेशन’ सुरू करण्यात आली आहे. जेणेकरून अधिकाधिक लोकांना याचा लाभ मिळेल.
कारमध्ये बसल्या बसल्या लोकांचे लसीकरण
मुंबईत कोरोनाविरूद्ध ‘ड्राइव्ह इन वॅक्सिनेशन’ सुरू करण्यात आली आहे. दादरमधील लसीकरण केंद्राच्या पार्किंगमध्ये लोकांना कारमध्ये बसून कोरोना लसीचा डोस दिला जात आहे. या ठिकाणी 200 कार उभ्या राहू शकतात. त्यामुळे या वाहनांनाच ‘ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र’ बनविण्यात आले आहे. कारमध्ये कोरोनाची लस दिल्यानंतर लोकांना निरीक्षणासाठी 30 मिनिटे थांबवले जातात.
‘ड्राईव्ह इन वॅक्सिनेशन’ सुविधा फक्त ‘या’ लोकांसाठी आहे
‘ड्राईव्ह इन वॅक्सिनेशन’ ही सुविधा मुंबईत सुरू करण्यात आली आहे, जे केवळ वृद्ध आणि दिव्यांगांसाठीच आहे. या लसीकरण केंद्रात, लोकांना त्यांच्या कारमधूनच यावे लागते आणि कारमध्ये बसून त्यांना लस दिली जाते. त्यानंतर ते आपल्या घरी कारने जाऊ शकतात.
आत्तापर्यंत १.६३ कोटी लोकांना लसी दिल्या
राज्याच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात ९ कोटींपेक्षा जास्त असलेल्या लोकसंख्येपैकी केवळ १.६३ कोटी लोकांना लसी देण्यात आल्या आहेत. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे लसांचा अभाव. राज्याच्या आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, १५ मे पर्यंत 45+ वयोगटातील लोकांसाठी २३.२७ लाख लस उपलब्ध असतील.