बंगळुरू – कर्नाटकातील कामराजनगर जिल्ह्यात ऑक्सिजनअभावी रुग्णालयात 24 कोविड रुग्ण दगावल्याच्या घटनेची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश बी. ए. पाटील यांचा एक सदस्य आयोग त्यासाठी नेमण्यात आला आहे. काल गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी आयोग स्थापनेसाठीची अधिसूचना जारी केली. तेथील जिल्हा न्यायालयात 3 मे रोजी ही घटना घडली होती. या आयोगाला एक महिन्याच्या आत आपला अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.
या चौकशी आयोगाला सर्व आवश्यक ती कागदपत्रे त्वरित सादर करण्याचा आदेश आरोग्य विभागाला देण्यात आला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने या घटनेची गंभीर दखल घेऊन याची न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला होता. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.
या घटनेच्या संबंधात माहिती देताना राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी ऑक्सिजनअभावी केवळ तीनच रुग्ण दगावल्याची माहिती दिली आहे. तथापि, कॉंग्रेसने या घटनेत 28 जण मरण पावल्याचे म्हटले आहे. आता न्यायालयीन चौकशीत नेमकी बाब समोर येईल, अशी अपेक्षा आहे.