नगर (प्रतिनिधी) – ऑक्सिजन रिफीलर किंवा उत्पादकांच्या प्लांटवरुन ऑक्सिजन घेऊन जाण्यासाठी केवळ प्राधिकृत व्यक्तींनाच पाठवा, अशी ताकीद जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज नगर शहर व जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना दिली. तसेच तेथे करोनाबाधित रुग्णांच्या नातलगांना ऑक्सिजन घेण्यासाठी पाठवूच नका, अशी तंबीही त्यांनी दिली आहे.
नगर शहर व जिल्ह्यात सदयस्थितीत करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजन बेड, आयसीयु व व्हेंटीलेटरवरची गरज असलेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याने मेडीकल ऑक्सिजनची मागणी वाढलेली आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजनचे सिलिंडर रिफिलर अथवा उत्पादक यांच्याकडून भरून आणण्यासाठी फक्त प्राधिकृत व्यक्तींनाच पाठवावे. रुग्णालयांनी अॅडमिट असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना त्यासाठी पाठवू नये, असे आदेशही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.
काही रुग्णालयांत अॅडमीट असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजनचे सिलेंडर रिफीलर किंवा उत्पादकांकडून भरून आणण्याबाबत सांगण्यात येत आहे. ही बाब अयोग्य असून त्यातून रिफीलर किंवा उत्पादकांच्या प्लांटवर अनावश्यक गर्दी वाढत आहे. त्यातून तिथे वादावादीचे प्रसंग घडत आहेत.
त्यामुळे रुग्णालयांनी त्यांच्या एखाद्या कर्मचार्यास ऑक्सिजन सिलेंडर आणण्याकरीता प्राधिकृत करावे व त्यांनाच ऑक्सिजन आणण्यासाठी पाठवावे. तसेच प्राधिकृत करण्यात आलेल्या व्यक्तिकडे प्राधिकारपत्र पाठवावे. त्याशिवाय आता रिफीलर किंवा उत्पादकांकडून ऑक्सिजन सिलेंडर भरुन मिळणार नाही , अशी ताकीद जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.