महिलांनी मासिक पाळीदरम्यान लस घेऊ नये? जाणून घ्या काय आहे वास्तव !

करोनाचा दुष्प्रभाव रोखण्यासाठी  1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व लोकांना लस दिली जाणार आहे. पण या बातमीबरोबर सोशल मीडियावरही सध्या अनेक प्रकारच्या अफवा पसरत आहेत. अशाच सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की स्त्रियांना मासिक पाळीच्या  5 दिवस आधी आणि पाळीनंतर 5 दिवस लस देऊ नये. कारण काय, तर मासिक पाळीच्या दरम्यान महिलांची प्रतिकारशक्ती कमकुवत होते. अशा परिस्थितीत लसीकरण हानिकारक ठरू शकते. चला तर मग या दाव्याचे सत्य जाणून घेऊया.

व्हायरल पोस्टमध्ये असे म्हटले जात आहे की महिलांचा मासिक पाळीचा कालावधी विचारात घेतल्यानंतरच करोनाची लस घेणे फार महत्वाचे आहे. तसे पाहता, करोना लसीशी संबंधित सर्व प्रकारच्या माहिती आणि मार्गदर्शक तत्त्वे भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परंतु या मार्गदर्शक तत्त्वामध्ये व्हायरल होत असलेल्या पोस्टशी संबंधित कोणतीही माहिती नाही.

गार्डियन न्यूजच्या वेबसाइटनुसार, अमेरिकन तज्ञांचे मत आहे की महिलांच्या मासिक पाळीच्या काळात लसीकरणाचा कोणताही परिणाम होत नाही. महिलांना पीरियड्स दरम्यान लसी दिली जाऊ शकते.

पीआयबी फॅक्ट चेकने देखील याची पुष्टी केली आहे की व्हायरल होणारी पोस्ट पूर्णपणे बनावट आहे. पीआयबीने लोकांना असे आवाहन केले आहे की अशा अफवांकडे दुर्लक्ष करा.

पीआयबीच्या म्हणण्यानुसार, 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व लोकांनी (मग त्या स्त्रीया असोत वा पुरुष) नोंदणी करणे आवश्यक आहे आणि 1 मेपासून सुरू होणाऱ्या  लसीकरण मोहिमेमध्ये सर्वांनीच लसीकरण करणे आवश्यक आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.