आगरा – देशात करोना संसर्गाची दुसरी लाट धुमाकूळ घालत आहे. दररोज लाखो रुग्ण देशात आढळून येत आहेत. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळं रुग्णालये कमी पडत आहेत. त्यात ऑक्सिजन बेड नसल्याची स्थिती आहे. करोना योद्धे रुग्णांसाठी आपला जीव पणाला लावत आहेत. या करोना योद्ध्यांसाठी आणि रुग्णांसाठी जर्मन कंपनीने खास पद्धतीची चप्पल आणली असून या चप्पलमुळं शरिरातील ऑक्सिजन वेगाने वाढत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
तंदुरुस्त राहण्यासाठी रोज साधारण ८ ते १० हजार पावलं चालण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. मात्र जर्मन कंपनीने आणलेली चप्पल घालून केवळ ३ हजार पावलं चाललं तरी रोजचं ८ हजार पावलं चालण्याचं टार्गेट पूर्ण होणार आहे. या चप्पलचा फायदा करोना रुग्ण आणि करोनायोद्ध्यांना अधिक होईल, असा दावा कंपनीने केला आहे. इतर शूज किंवा चप्पलमध्ये ७ तास बॅक्टेरिया चिकटलेले असतात. मात्र या चप्पलला सहज सॅनिटाईज करता येऊ शकतं, असंही कंपनीने म्हटलं आहे. कंपनीकडून १० चप्पल करोनारुग्ण आणि करोनायोद्ध्यांना मोफत देण्यात येणार आहे.
चप्पल व्यावसायिक आशिष जैन यांनी म्हटलं की, जर्मन चप्पल तयार करण्याचं काम सुरू आहे. ही चप्पल घालून ३ हजार पावलं चाललं तरी ८ हजार पावलं चालल्याचा फायदा होतो. ही चप्पल चालत असताना प्रत्येक पावलावर पायाच्या मांसपेशींना अडीचपट अधिक दाबते. त्यामुळे शरिरातील ब्लड सर्कुलेशन आणि ऑक्सिजन वेगाने वाढतो. या पद्धतीच्या चप्पल तयार करण्यासाठी खास मटेरियल वापरलं जातं, असंही जैन यांनी म्हटलं.