वारजे – ज्येष्ठतेनुसार पदस्थापना देण्यात यावी वर्ग 1, वर्ग 4 यांना मुख्यालय ते मुख्यालय हा नियम नाही, त्यामुळे त्यांना बदलीमध्ये पदस्थापना देण्यात येते. तर वर्ग 3च्या अधिकाऱ्यांच्या बदलीमध्ये हा नियम का नाही? यातून करोना योद्धा म्हणून आतपर्यंत सत्कार, सन्मान केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचीच बदली प्रक्रियेमध्ये पिळवणूक होत आहे. विशेषत: महिला कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार करण्यात येऊन बदली प्रक्रियेत वर्ग 3ची विनंती मान्य करण्यात यावी, अशी मागणी आरोग्य कर्मचारी कृती समितीकडून करण्यात आली आहे.
शासनाने मागण्या मान्य न केल्याने आरोग्य विभाग-वर्ग 3 कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवा संचालक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
राज्य समन्वयक रवींद्र मल्हारी पाटील म्हणाले, अधिपरिचारिका हा अत्यावश्यक सेवेचा महत्त्वाचा भाग असून प्रशासकीय बदल्यांमध्ये वर्ग 1 रिक्त पदे असतानादेखील पदस्थापना नाकारण्यात येते. कोणतेही शासन निर्णय नसताना मुख्यालय ते मुख्यालय बदली देण्यात येणार नसल्याचे कारण सांगण्यात येते. पुण्यातील संस्थांमधील अधिपरिचारिकांची पदे रिक्त ठेवून ग्रामीण भागात बदली केली जाते.
ग्रामीण भागातील अधिपरिचारिकांना शहरी भागात पदस्थापना आवश्यक आहे. याबाबत संचालकांकडे निवेदन सादर केले असून याबाबत निर्णय झाला नसल्याने अन्यायकारक बदली आदेश काढल्याने सर्व अन्यायग्रस्त कर्मचारी मंगळवार (दि.10) पासून संचालक आरोग्य सेवा, पुणे यांच्या कार्यालयासमोर उपोषण करीत आहेत.
यावेळी येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील अधिपरिचारिका दीपाली पानसरे, डॉ. बांदोरावाला कुष्ठरोग रुग्णालयातील वैशाली गुरव आदी उपस्थित होत्या. यासंदर्भात अर्चना पाटील, संचालक, आरोग्य सेवा, आरोग्य सेवा संचालनालय, यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला.
मेऐवजी ऑगस्टमध्ये बदली अन्यायकारकच…
शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या या बदली अधिनियम 2005 अन्यवेच करणे शासनास बंधनकारक असून सदर अधिनियमानुसार बदलीपात्र कर्मचारी यांच्या प्रशासकीय बदल्या 31 मे पूर्वीच करणे बंधनकारक असताना या बदल्या ऑगस्टमध्ये करणे हे कर्मचारी यांच्यावर अन्याय कारक आहे. मात्र, करोना स्थितीत यास कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवला नाही. तसेच, सदर बदल्या करताना नागरी सेवा मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या समुपदेशन प्रकियेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये अनेक त्रुटी व क्लिष्टता होत्या.