सिंहगड रस्ता : शहरात करोनाची स्थिती दिवसें दिवस गंभीर होत असताना; रूग्णांना ऑक्सिजन बेडची गरज भासत आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा सक्षम करण्यासह लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज असल्याचे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. प्रभाग क्रमांक 34 च्या स्थानिक नगरसेविका मंजूषा नागपूरे यांच्या पुढाकारातून सिंहगड रस्त्यावर माणिकबाग येथील नरहरी कुदळे ऍमेनिटी स्पेस, कुदळेपाटील टाऊनशिप येथे करोना लसिकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या तसेच या ठिकाणीच वाडेकर नर्सिंगहोम मध्ये 10 ऑक्सिजन बेड तसेच 20 आयसोलेशन बेडची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही सुविधांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
भाजप शहराध्यक्ष जगदिश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, भाजपचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस दिपक नागपूरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सिंहगड रस्ता कार्यवाह मंगेश पाटील, देवेंद्र गानू , डॉ. वाडेकर तसेच नगरसेविका मंजूषा नागपूर, क्षेत्रीय अधिकारी जयश्री काटकर यावेळी उपस्थित होत्या.
सिंहगड रस्ता परिसरासाठी लायगुडे दवाखाना आणि वडगाव बुद्रुक परिसरात लसीकरण केंद्र आहे. मात्र, या भागात एकही लसीकरण केंद्र नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन या ठिकाणी केंद्र सुरू करण्यासाठी नगरसेविका नागपूरे यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. मात्र, त्यासाठी केंद्रा लगत हॉस्पीटल असणे आवश्यक असल्याने वाडेकर हॉस्पीटलशी सलग्न हे केंद्र सुरू करत या हॉस्पीटल मध्ये 10 ऑक्सिजन बेडची सुविधाही असणार असल्याचे नगरसेविका नागपूरे यांनी यावेळी बोलतान सांगितले.
या वेळी वडगाव स्मशानभूमी येथे चितेला अग्नी देणाऱ्या चव्हाण यांचा आंब्याची पेटी, भगवदगीता, टेम्प्रेचर गन,कपडे व त्यांच्या पत्नीला साडी चोळी भेट देऊन सत्कार करण्यात आला.