“जंगलराज! उत्तर प्रदेश, हरियाणाकडून इतर राज्यांच्या ऑक्सिजन टँकर्सची अडवणूक”

नवी दिल्ली – देशात करोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट हाहाकार माजवत आहे. नव्याने बाधित झालेल्या रुग्णांचा मोठा विस्फोट होत असल्यानं आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथे देखील करोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येतायेत. इतर राज्यांप्रमाणे दिल्लीलाही बेड्सची कमतरता, रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा तुटवडा या समस्या भेडसावत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनोज सिसोदिया यांनी देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना एक पत्र लिहीत उत्तर प्रदेश व हरियाणावर गंभीर आरोप केले आहेत.

सिसोदिया यांनी लिहलेल्या पत्रात, दिल्लीसाठी केंद्र सरकारने ४८० मेट्रिक टन ऑक्सिजन मंजूर केला असताना काही राज्यातील राज्य सरकारं ‘जंगलराज’ असल्याप्रमाणे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  खास करून उत्तर प्रदेश व हरियाणा येथे ऑक्सिजन पुरवठ्याच्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी ठाण मांडून बसले असून ते इतर राज्यांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या टँकर्सची अडवणूक करत आहेत, असा दावा देखील त्यांनी पत्राद्वारे केला आहे.

सिसोदिया यांनी,  “केंद्र सरकारने दिल्लीसाठी नेमलेल्या ऑक्सिजन वितरकांशी आज फोनद्वारे संपर्क साधला. यावेळी त्यांनी, काल हरियाणातील पानिपत येथे असलेल्या ऑक्सिजन पुरवठा केंद्रावर हरियाणा पोलिसांनी दिल्लीसाठी सोडण्यात येणाऱ्या ऑक्सिजन टँकर्सना अडवले. येथून दिल्लीला १४० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळणार होता मात्र पोलिसांच्या अडवणुकीमुळे केवळ ८३ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळू शकला. आजही केवळ ५८ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाला आहे.” असा थेट आरोप पत्राद्वारे लगावला आहे.

उत्तर प्रदेशातील आयनॉक्स ऑक्सिजन प्लांट येथे देखील असाच प्रकार घडल्याचा आरोप सिसोदिया यांनी केला आहे. तसेच या पत्राद्वारे त्यांनी आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याकडे दिल्लीला आपल्या हक्काचा ऑक्सिजन मिळावा यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.