नगर (प्रतिनिधी) – करोनाचा संसर्ग झालेल्या अनेक रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यात नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे ऑक्सिजनची निर्मिती करणार्या नगर जिल्ह्यातील प्लँट चालकांनी यापुढे केवळ नगर शहर व जिल्ह्यतील करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणार्या रुग्णालयांनाच ऑक्सिजनचा पुरवठा करावा, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज जिल्ह्यातील ऑक्सिजन निर्मिती करणार्या प्लँट चालकांना दिली आहे.
दरम्यान, करोनाच्या संकटकाळात जिल्हा प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करुन अन्यत्र ऑक्सिजन पुरवठा करताना आढळून आल्यास त्यांच्यावर साथरोग अधिनियम 1897च्या आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार गुन्हे दाखल करुन कडक कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.
या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी तथा नगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप निचित यांनी परिपत्रक जारी केले आहे. नगर जिल्ह्यात सद्यस्थितीत करोनाबाधित असल्याचे उपचार घेणार्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यात व्हेंटीलेटर तसेच ऑक्सिजन बेडची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
सबब, वाढत्या महागाईनुसार ऑक्सिजन केवळ वैद्यकीय कारणात्सव राखीव असणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्ह्यातील लिक्विड ऑक्सिजन उत्पादक व रिफिलर यांना निर्माण होणारा ऑक्सिजन शंभर टक्के वैद्यकीय कारणासाठीच राखीव ठेवावे बंधनकारक करण्यात आले असल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे.
स्थानिकांकडून ऑक्सिजनचे जिल्ह्याबाहेर वितरण…!
जिल्ह्यातील लिक्विड ऑक्सिजन उत्पादक तथा रिफिलर यांच्याकडून लिक्विड ऑक्सिजनचा वापर औद्योगिक कारणासाठी होत आहे. काही जण जिल्ह्याच्या बााहेर त्याचा पुरवठा व विक्री करत असल्याचेही निदर्शनास आले आहे. संकटकाळात निर्माण होणार्या ऑक्सिजनची अशी विल्हेवाट लावणे योग्य नाही. त्यामुळे यापुढे असे कृत्य करताना आढळल्यास साथ रोग अधिनियमानुसार त्यांच्यावर सक्त कारवाई होईल, अशी तंबीही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.