नगर (प्रतिनिधी) – फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून सेवेत असलेले महानगरपालिकेचे दोन कर्मचारी अत्यवस्थ असून, त्यांना रेमडेसिविर मिळविण्यासाठी महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे काल रात्रीपासून संघर्ष करत आहे. तथापि, त्यांना महापालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय अथवा जिल्हा शासकीय यंत्रणेकडून प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार आहे.
महापालिकेचे यापूर्वी तब्बल 11 कर्मचार्यांचा करोनाबळी झाला आहे. आताही फ्रंटलाईनवर काम करणार्या दोघा कर्मचार्यांना करोना संसर्ग झाला असून, ते ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तेथील डॉक्टरांनी रेमडेसिविर देण्याची गरज असल्याचे सुचविले आहे. त्यावरुन महापालिका कामगार युनियन व अध्यक्ष अनंत लोखंडे रेमडेसिविर मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
काल रात्रीपासून त्यांनी त्यासाठी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, तहसिलदार, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्याधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षा, या सर्वांना संपर्क साधला आहे. मात्र, त्यांना रेमडेसिविर उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. ते कधी मिळेल, याची खात्रीपूर्वक माहितीही उपलब्ध होत नसल्याने कर्मचारी तणावात आहेत.
फ्रंटलाईनवर काम करणार्या महापालिका कर्मचार्यांच्या आरोग्याच्या प्रश्नावर अलिकडेच महापालिकेत बैठक झाली होती. त्यात कर्मचार्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते. कर्मचारी युनियनचे पदाधिकारी व महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. तथापि, आता गरज पडल्यानंतर त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची संतप्त भावना कर्मचार्यांकडून व्यक्त होत आहे.
महापालिका युनियनकडून मिळालेल्या माहितीनुसार एक महिला व एक पुरूष दोन्ही कर्मचारी रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टर सांगतात. त्यामुळे जीव टांगणीला लागला असल्याची कर्मचार्यांची भावना आहे.
करोनाच्या संकटातही अत्यावश्यक सेवा म्हणून महापालिकेचे कर्मचारी इमानदारीने काम करीत आहेत. खास करुन शहरचा पाणीपुरवठा व स्वच्छतेसाठी हे कर्मचारी राबत आहेत. त्यात आतापर्यंत दीडशेपेक्षा जास्त कर्मचार्यांना करोना संसर्गाचे निदान झाले. त्यातील अकराजण करोनाबळी ठरले. आताही रूग्णालयात काम करणारी एक नर्स व पाणीपुरवठा विभागाचा एक कर्मचारी करोनाचा संसर्ग झाल्याने रूग्णालयात उपचारासाठी दाखल आहे. त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता आहे. ते उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी असलेले आता जबाबदारी झटकत असल्याने संताप होत आहे.
अनंत लोखंडे
अध्यक्ष, महापालिका कामगार युनियन.