ब्रुसेल्स – युरोपने कोविड -19 च्या मृत्यूसंख्येमध्ये दहा लाखांचा टप्पा ओलांडला आहे आणि प्रत्येक आठवड्यात या प्रदेशात सुमारे 16 लाख नवीन रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती गंभीर आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ अधिकारी डॉ. हन्स क्लुगे यांनी सांगितले आहे. एकंदरीत, जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, जगभरात कोविड -19 मुळे जवळजवळ 30 लाख मृत्यू झाले आहेत. अमेरिकेला या साथीचा सर्वाधिक फटका बसला. अमेरिकेच्या पाठोपाठ युरोपला मोठा फटका बसला. अमेरिका, ब्राझील आणि मेक्सिकोमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे.
ऍस्ट्राजेनेकाची करोना विरोधी लस घेणाऱ्या लोकांपेक्षा कोविड -19 झालेल्या लोकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका खूपच जास्त आहे. कित्येक देशांमध्ये प्रादुर्भाव संथ होऊ शकतो याची लक्षणेही आढळली आहेत आणि वृद्ध लोकांमध्ये प्रादुर्भावाचे प्रमाण घटत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
डॉ. क्लुगे म्हणाले की, लसींसाठी प्राधान्य दिल्या गेलेल्या 80 वर्षांपेक्षा जास्त लोकांमध्ये कोविड -19 मधील मृत्यूंचे प्रमाण जवळजवळ 30 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. सध्याच्या घडीला, कोविड -19 असलेल्या एखाद्याला ऍस्ट्राजेनेका लस घेतलेल्या व्यक्तीपेक्षा रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका जास्त आहे. तथापि, कोविड -19 रुग्णालयात दाखल व्हावे लागणे आणि मृत्यूपासून बचाव करण्यासाठी ऍस्ट्रॅजेनेका लसीच्या परिणामकारकतेबद्दल शंका नसावी असे सांगून “डब्ल्यूएचओ’ने सर्व पात्र प्रौढांसाठी ऍस्ट्राजेनेकाचा वापर करण्याची शिफारस केली, असल्याचे डॉ. क्लुगे यांनी सांगितले.